• +91 9422855220, 9860939577
  • manoharraosune@gmaile.com, kailasdeshmukh80@gmail.com

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ

blog-post-image

वृत्तपत्रात बातमी लिहतांना व इले.मिडीयावर निवेदन करतांना घ्यावयाची दखल


बातमी (News) म्हणाजे काय?

स्वातंत्रानंतर वृत्तपत्रे लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ बनलेली आहे. यामुळे वृत्तपत्रात बातमी देतांना किंवा इले.चॅनलवर वृत्त निवेदन करतांना अनेक बाबी सांभाळाव्या लागतात. दैनंदिन जीवनात घटनेपेक्षा काही नवीन घडते त्याचा सार्वजनिक जीवनाशी संबंध असेल तर त्याला बातमी असे म्हणतात. वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द करताना, बातमी शोधताना, संपादित करताना व इले.मिडीयावर वृत्त निवेदन करतांना खालील निकषांचा विचार करावा.


निकष

१) निकटता, २) अदूभूतता किंवा अलौकिकता, २) संख्यात्मक, गुणात्मक प्रमाण, ४) व्यक्तिमहात्म, ५) असामान्य कृर्तत्व, ६) अपघात, गुन्हे, दंग, प्राणहानी, ७) घटनेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, ८) नैसर्गिक अनियमितता, ९) स्थानपरत्वे व कालपरत्वे बातमीचे महत्व, १०) परिणामकता


बातमी लिहिताना व इले.मिडीयावर वृत्त निवेदन करतांना लक्षात ठेवण्याचे मुद्दे

बातमी लिहिताना महत्वाचा मुद्दा व घटना बातमीच्या सुरुवातीला लिहाव्यात, दुसऱ्या व तिसऱ्या परिच्छेदात बातमीचा सारांश असावा, आवश्यक असल्यास त्यानंतर सविस्तर वृत्त द्यावे. बातमी अशा पध्दतीने लिहिली पाहिजे की ती कोठेही तोडली तरी मुख्य मुदे आणि अर्थ गमावता कामा नये, वाचक बातम्या घाईत वाचत असल्यामुळे महत्वाच्या बाबी पहिल्या काही ओळीतच सांगाव्यात, वर्तमानपत्रात जागेला अत्यंत महत्व असते. त्यामुळे बातमी कमी झाब्दात पण सर्व मुद न सोडता लिहावी. बातमीस विशेषणं वापरू नयेत किवा सर्वत्र समाधान/कौतुक/अभिनंदन होत आहे अशी वाक्ये लिहू नयेत. साध्या व प्रभावी भाषेत लिहावे, कठीण अवजड शब्द वापरू नयेत. सामान्य वाचकांना बातमी समजली पाहिजे.
बातम्या लिहिताना वृत्तपत्राचा मतप्रदर्शन व अकारण काव्य लिहिण्याचा मोह टाळावा.
बातम्या लिहिताना वृत्तपत्राचा वाचकवर्ग कोणता हे लक्षात ठेवावे. अक्षर मोठे, सुटे आणि खोडाखोड न केलेले असावे, भाषा शुध्द असावी, प्रत्येक ओळीत अंतर ठेवावे व डाव्या बाजूस मोकळी जागा ठेवावी म्हणजे बातमी सुधारण्यास जागा राहते. अशाचप्रकारे इले.मिडीयावर वृत्त निवेदन करतांना बातमीचे ठळक शिर्षक निवेदन करावे व नंतर संपर्ण वृत्त विश्‍लेषण करावे. यामध्ये विकासात्मक बातमी असल्यास त्याबाबतचे संपुर्ण विश्‍लेषण करावे, तक्रार वृत्त असल्यास संबंधीत अधिकारी किंवा पदाधिकारी यांचे मतही त्यामध्ये घ्यावे, एकच बाजू असलेले वृत्त कधीही देण्यात येऊ नये.


बातम्यांची उगमस्थाने

१) वृतसंस्था, पी.टी.आय, यु.एन. आय, सरकारी माहिती खाते, जिल्हा सूचना व माहिती खाते, महानगरपालिका.
२) जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी कार्यालय.
३) सभा, संमेलने, मेळावे, शिबिरे, चर्चासत्र.
४) साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक संघटना.
५) सरपंच, पोलीस पाटील, ग्राम विकास योजना.
६) समाजकल्याण कार्यालय, रोजगार हमी व रोजगार विनिमय कार्यालय.
७) वेधशाळा, प्रयोगशाळा, विज्ञान संशोधन केंद्रे.
८) सहकारी संस्था खरेदी विक्री संघ, व्यापारी, कामगार.
९) विद्यापीठ, न्यायालये, इस्पितळे, पोलीस स्टेशन, कंट्रोल रूम, सुरक्षा कार्यालये.
१०) सर्व राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते, महिला संघटना, जिल्हाधिकारी, उपायुक्‍त.
११) क्रीडा, नाट्य संस्था, शाळा, महाविद्यालये.
१२) अपघात, गुन्हे दंगल, प्रचार.


माहेवारी बातम्यांचे महत्व

जानेवारी-एप्रिल
१) महाविद्यालयांच्या परिक्षांसंबंधी वृत्ते
२) रब्बी पिकांच्या उत्पादनांच्या संदर्भात बातम्या
३) आंबा आणि इतर फळांची आवक-जावक
४) अर्थसंकल्पांच्या प्रतिक्रीया.
मे
१) सुट्यातील प्रवाशांच्या अडचणी, सोयी, गैरसोयी, लग्नसराई, कपडे, साने चांदी आदींच्या उलाढाली आणि पावसाचे, हवामानाचे अंदाज.
बातमी लिहिताना नावे आणि संख्या अचूक आहे किंवा नाही हे पुन्हा नीट तपासून घ्यावे हे अत्यंत महत्वाचे आहे.
जून-जुलै
१) जून//जुलैमध्ये पावसाच्या बातम्या, शेतीची पेरणी, खते, बी-बीयाणे यांचे वाटप
२) झाळा-महाविदालये आरींचे प्रवेश शालेय गणवेश, छत्या, पाठ्यपुस्तके वह्या आदींबाबत अडचणी
३) दररोज पावसाचे वृत्त शक्‍य तेये दयावे.

ऑगस्ट-सप्टेंबर
(झेतींच्या बातम्या व्यतिरिक्त)
१) सणांसाठी वाढणाऱ्या वाहतुकीच्या अडचणींच्या बातम्या, एस.टी.स्थानकावरील सोयी-गैरसोयी, खास व्यवस्था, पावसामुळे बाहतुकीत येणारे व्यत्यय.
२) रेशन, साखर, रवा, तेल आदि सणांसाठी लागणाऱ्या वस्तुंच्या पुरवठ्याच्या बातम्या.
३) पावसामुळे होणारी घरांची पडझड, शिवाय पूर, दुष्काळ आदींच्या बातम्या, विद्यार्थी संसदांच्या निवडणुका
ऑक्टोंबर-नोव्हेंबर-डिसेंबर
१) सण आणि सुट्यांच्या काळात जीवनाइ्यक वस्तूंचा पुरवठा आणि किंमत वाहतुकीवर पडणारा ताण, खास सोयीसवलती सहल
२) शाळा-महाविद्यालयांची स्नेहसंमेलने
३) खरीपपिकांची आणेवारी व परिस्थिती
४) रब्बी पिकांच्या पेरण्या
५) क्रीडा स्पर्धा, सहली, पुरवणी परीक्षत्त, कॉप्यांचे प्रकार आदी.
६) याच महिन्यात यात्रा, उर्स सभा -संमेलने, चर्चा परिसंवाद सर्वात जास्त असतात.
७) धान्य-कडधान्य आणि कापूस आदींची आवक-जावक साखर कारखान्याचा गतिळाचा हंगाम
८) कापूस एकाधिकार, खरेदी -विक्री संघ, मार्केटींग सोसायट्या आदींच्या उलाढाली


गुन्ह्यांची बातमी

गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो माणूस गुन्हेगार नसतो. चोरीसाठी, खुनासाठी पकडले असे न म्हणता, चोरीच्या आरोपावरून, खुनाच्या आरोपावरून पकडले असे म्हटले पाहिजे. गुन्ह्याबाबत बातमी देताना गुन्ह्याची पोलीस स्टेशनला नोंद झाली आहे काय हे प्रथम पाहिले पाहिजे. गुन्ह्याबाबत एफआयआर (गुन्ह्याची प्राथमिक नोंद) असते. ती पोलीस स्टेशन डायरी पाहिली पाहिजे.
गुन्ह्यांची नोंद पोलिसात झाली नसेल, भ्रष्टाचार वा गैरप्रकार अगर अशा प्रकारच्या बातम्या देताना पुरेसा पुरावा वृत्तपत्र कचेरीत असावा लागतो.
एखाद्या माणसाच्या सांगण्यावरून गुन्ह्याची बातमी द्यावयाची असेल तर तसे करण्यापूर्वी सदर साक्षीदाराला व कबुलीजवाब देणाऱ्याला कोर्टात नेऊन न्यायालयासमोर त्याचे प्रतिज्ञापत्र (ऑफिडेव्हिट) घेऊन मगच बातमी छापावी. कारण तो दबावाखाली बदलल्यास अशा प्रतिज्ञापत्राचा उपयोग होऊ शकतो. वृत्तपत्रावर दोन बातमीत अनेक खटले होत असतात, विशेषतः बदनामी, कोर्टाचा किंवा विधीमंडळाचा वा संसदेचा अपमान केल्याबद्दल खटले होतात. हे लक्षात घेऊन या बातम्यांबाबत आत्यांतिक काळजी घेतली पाहिजे. विशेषतः संस्था, प्रतिष्ठित व्यक्‍ती, नेतेमंडळी यांच्याविरूध्द बातम्या देताना अधिक काळजी घेतली पाहिजे यासाठी पुन्हा एकदा सूत्ररूपाने अशी बातमी लिहिताना कोणती काळजी ध्यावी हे खाली देत आहे.
१. गुन्ह्यांची नोंद पोलीसात केली की नाही हे पाहणे.
२. खटल्यातील संबंधित गुन्ह्याचा आरोप असलेल्या व्यक्तीस गुन्हेगार असे संबोधू नये त्याला आरोपी म्हणावे.
३. पोलीसात गुदरलेल्या तक्रारीची प्रत वार्ताहराने मिळवावी.
४. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार किंवा पोलीस सुत्रानुसार असे लिहावे.
उदा.रामाने काल रात्री एक वाजता त्याच्या बायकोचा खून केला असे न लिहता - रामावर आपल्या बायकोचा रात्री एक वाजता खून केल्याचा आरोप असून त्याला फौजदारी कायद्याच्या ३०२ कलमान्वये अटक झाली आहे असे लिहावे.
पुढच्या परिच्छेदाची पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार पोलीस सुत्रानुसार असे म्हणून पुढची माहिती द्यावी.
५. ज्यांच्यावर आरोप केला असेल ते सवयीचे गुन्हेगार नसून सुशिक्षित असतील तर काळजी अधिक घ्यावी. कारण ते जागरूक असतात व अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात.
६. भ्रष्टाचाराविषयीच्या प्रकरणात खात्यातर्फे चौकशी चालू आहे काय? आरोपीला कचेरीतून शो -कॉज नोटीस दिली आहे काय? या गोष्टीचाही विचार करावा.
७. अनेकवेळा लोक भ्रष्टाचाराची आरोप करणारी निवेदने एकाच्या व अनेकांच्या सह्यांनी देतात. बातमीला आम्ही जबाबदार आहोत असे सांगतात. इतर पुरवा असल्याखेरीच केवळ सहीने आरोप केला म्हणून व सहीने लेख लिहिला म्हणून संपादकाची जबाबदारी नाहिशी होत नाही. वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या प्रत्येक बातमीची जबाबदारी, प्रकाशक, मुद्रक आणि संपादक यांच्यावर असते कायद्यानुसार पोलिसांसमोर दिलेली जबानी न्यायालय अंतिम आणि सत्य म्हणून ग्राह्य धरत नाही. न्यायाधीशासमोर दिलेली जबानीच ग्राह्य धरली जाते. मालकाने नोकराकडून धेतलेली जबानी, पतीने पत्नीकडून घेतलेली जबानी ग्राह्य धरली जात नाही.
८. पोलीसांच्या आधी गुन्ह्याची बातमी कळली तर ती छापण्यापूर्वी पोलीसां कळविणे कर्तव्य असते. जाणीवपूर्वक गुन्ह्याची खबर पोलिसांना दिली नाही तर गुन्हा ठरतो.
९. सार्वजनिक संस्थावर आरोप करण्यापूर्वी गुन्ह्याची व गैरप्रकारची पूर्ण खात्री करून घ्यावी. कारण संस्थाच्या उभारणीस वर्षानुवर्षे लागतात परंतु बदनामीस काहीच वेळ लागत नाही.


न्यायालयाचा अवमान

न्यायालयाची वृत्ते देण्यापूर्वी खालील गोष्टींची काळजी घ्यावी.
१) न्यायालयाचे वृत्त देताना, जे घडले तेच कोणत्याही मल्लीनाथीशिवाय दिले पाहिजे. वाद विषय असलेल्या दोन्ही पक्षांपैकी कोणत्याही एका पक्षाबाबत अनुकूल व प्रतिकूल ग्रह होईल असे लिहणे हा न्यायालयाचा अपमान होतो.
२) न्यायालयाचा निकाल देताना, निकालपत्राचा आधार घ्यावा म्हणजे चूक होत नाही.
३) निकालपत्रातील होवटचा आदेशात्मक मजकूर हा सर्वात महत्वाचा असतो. त्याचे भाषांतर करताना काळजी घ्यावी.
४) न्यायालयाच्या निकालावर बातमीत भाष्य करू नये. परंतु निकालावर टीका करण्याचा अधिकार संपादकाला असतो. त्याने कोर्टाचा अपमान होत नाही.
५) न्यायालयाच्या बातम्या बाहेरून कोणी आणल्यास वकिलाचे नाव असलेल्या कागदावर वकिलाची सही असणे आवश्‍यक आहे.
६) एखाद्या खटला दाखल झाल्यानंतर खटल्यातील संबंधित व्यक्‍ती वा आरोपासंबंधी कोणतीहि बातमी छापणे हे कोर्टाच्या अंमलाखाली येते. फक्त कोर्टातील वृतताचाच जसाच्या तसा शक्‍य तर त्याच शब्दात वृत्तांत देता येतो.
७) न्यायालयाच्या बातम्या देताना दोन्ही बाजूच्या वकिलांची नावे देण्यात काळजी घ्यावी. तसेच कोणत्या कोर्टात व कोणत्या न्यायाधीशासमोर खटला चालू आहे. त्याचाही उल्लेख करावा.
वृत्तपत्रामध्ये बातमी लिहतांना किंवा इले.मिडीयावर वृत्त देतांना कशाप्रकारे ते दिले पाहिजे याबाबत अनुभवी पत्रकारांना कोणतीही पदवी धेण्याची गरज नाही परंतु नवोदीत पत्रकारांनी वरील बाबीत वृत्तपत्रात बातमी देणे किंवा इले.मिडीयावर वृत्त निवेदन करणे याकरीता वरील लेख उपयोगी पडणार आहे. याप्रमाणे जे पत्रकार नियम पाळतील अशाच पत्रकारांच्या मागे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने उभे राहावे हे माझे मत आहे.



अँड. किरण अमोलराव भुते,
अमरावती

blog-post-image

पत्रकारितेतुन समाजसेवा. राजकीय नेतृत्वाकडे ..


user-img
  • नाव: मनोहर सदाशिवराव सुने
  • गाव: शिरजगाव कसबा ता.चांदुर बाजार जि.अमरावती
  • जन्मतारीख: ३ ऑगस्ट १९६५
  • शिक्षण: बी.ए तसेच जनसंवाद व पत्रकारिता पदवी
  • भूषविलेली पदे

  • संस्थापक अध्यक्ष:पत्रकार पतसंस्था
  • संस्थापक अध्यक्ष:अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ
  • संस्थापक अध्यक्ष:विदर्भ शेतकरी प्रोड्युसर कंपनी
  • अध्यक्ष:मेघा पाणीवापर संस्था
  • कार्याध्यक्ष:विदर्भ ग्रामीण विकास संघर्ष समिती
  • सचिव:विदर्भ शेतकरी कृती समिती
  • समन्वयक:अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ,मंबई
  • सदस्य:सल्लागार मंडळ, बारी समाज विकास संस्था
  • सद्याची पदे

  • सदस्य:माजी जिल्हा नियोजन समिती, अमरावती
  • माजी सभापती:अर्थ व आरोग्य समिती, जि.प.अमरावती
  • माजी सदस्य:माध्यमिक शिक्षण समिती, जि.प.अमरावती

जातीय समीकरणे व निवडणुकीत पैशाच्या अतिवापराने गढुळ झालेल्या राजकारणात सहसा चांगले लोक येत नाहीत, असा काहीसा समज गेल्या काही वर्षातील राजकारण पाहता दिसून येतोय; मात्र काही लोक समाजसेवेच्या माध्यमातून आपल्या कार्याची एक अमीट छाप सोडून जातात. त्यापैकीच एक म्हणजे जिल्हापरिषदेच्या अर्थ व आरोग्य समितीचे सभापती मनोहर सदाशिवराव सुने समाजकारण व राजकारणात आपल्या कार्याची वेगळी ओळख करूण देणारे मनोहर सुने आज तरूणांसाठी 'आयकॉन' ठरले आहेत.

पत्रकारिता तसेच समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणात स्थिरावलेल्या या संयमी नेतृत्वाची वाटचालसुध्दा तितकीच प्रतिकुल परिस्थितीत झाली. आणपही समाजाचे काही देणे लागतो, ही भावना उराशी बाळगून मनोहर सुने यांनी समाजसेवा केली. घरची परिस्थिती सामान्य वर्गात मोडणारी स्वत:चा फटाक्यांचा व्यवसाय,किराणा दुकान व न्यूजपेपर एजन्सी चालवून ते आजही कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. १९८६ मध्ये ग्रामीण पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली. आज या संघटनेचा वटवृक्ष झाला आहे. पत्रकारिता करताना ग्रामीण पत्रकारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर जीवनाचा गाडा हाकला जात नाही,हे ओळखून त्यांना जोडव्यवसाय करता यावा सासाठी पत्रकार तसेच नागरिकांसाठी शिरजगाव कसबा येथे त्यांनी पतसंस्था काढली. त्या माध्यमातून सहकारक्षेत्रात सुध्दा त्यांनी आज एक वेगळी विश्‍वासार्हता निर्माण केली. आज या पतसंस्थेची उलाढाल वाढली आहे. त्यांच्या याच समाजकार्याची पावती त्यांना लवकरच जनतेकडुन मिळाली. माजी पालकमंत्री दिवंगत विनायकराव कोरडे यांच्या आर्शीवादाने २००२ मध्ये पहिल्या ते जिल्हापरिषद सदस्य बनले. निवडून आल्यानंतर त्यानी तालुक्‍यातील अनेक ज्वलंत समस्यांना हात लावून त्या निकाली काढल्या. गावकरी तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या सहकर्यातून आपल्या कार्यकाळात त्यांनी शिरजगाव कसबा येथे पथदर्शी प्रकल्पांतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी, पशुचिकित्सालय, मटणमार्केट, कार्तिकस्वामी व्यायामशाळा,अंगणवाडी बांधकाम, सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद उर्दू तसेच मराठी मुलांच्या नविन शाळा इमारतीचे बांधकाम, मेघा नदीलतगतच्या सुरक्षा भिंतीचे काम,छिंदवाडी पाझर तलावाचे नूतनीकरण, मेघा पाणीवापर सहकारी संस्थेची स्थापना, महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, अनुसूचीत जाती योजने अंतर्गत विविध कामे त्यांच्या कार्यालयातच पूर्ण झालीत. आज नागरिक त्या सुविधांचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे देऊरवाडा-माधान या रस्त्याची दुरूस्ती व पाणीशुध्दीकरण सयंत्राची कामे झाल्याने या क्षेत्रात मनोहर सुने यांचे नाव आदराने घेतले जाते. सामाजिक वारसा जपतानाच राजकारणात पदार्पण करणाऱ्या मनोहर सुने यांना पुन्हा मतदारांनी आपला प्रतिनिधी म्हणून जिल्हापरिषदेत पाठविले. या वेळी त्यांना थेट अर्ज व आरोग्य या महत्वाच्या समितीचे सभापतीपद मिळाले. समाजकार्याचा वसा घेणाऱ्या मनोहर सुने यांनी या संधीचे सोने करीत आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केला. जिल्हयाची विस्कळीत झालेली आरोग्ययंत्रणा पुन्हा वळणीवर आणण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची विशेष काळजी असल्याने त्यांनी आरोग्य सभापती म्हणून राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यात १३ नव्या प्राथमिक आरोग्य केद्रांना मंजुरी मिळाली. याशिवाय औषधपुरवठा तसेच अन्य समस्या निकाली निघाल्या. आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीत सुधारणा आणण्याच्या दृष्टीने काहीतरी भरीव मदत मिळावी. यासाठी थेट नागपूर अधिवेशन तसेच मंत्रालयात जाऊन भांडणारे मनोहर सुने आज राजकारणात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नवयुवकांसाठी "पॉलिटिकल आयकॉन' ठरलेले आहेत.

ठळक कामे

  • प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरजगाव कसबा येथे कार्यान्वीत केले.
  • शिरजगाव कसबा गावात पथदर्शी योजने अंतर्गत पाण्याची टाकीचे निर्माणकार्य.
  • चांदुर बाजार तालुक्‍यात शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने २७ नवीन ट्रान्सफार्मर बसवून घेतले.
  • देऊरवाडा व शिरजगाव कसबा येथे व्यायाम शाळेचे बांधकाम.
  • देऊरवाडा, जसापूर, माधान नाली सरळीकरण.
  • देऊरवाडा, पाळा व थुगांव पूर्णा येथे हरियाली योजना मंजूर करवून घेतली.
  • छिंदवाडी पाझर तलावाचे नूतनीकरण
  • देऊरवाडा व पांढरी येथे समाजमंदिराचे बांधकाम
  • शिरजगाव कसबा येथे जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळा इमारतीचे बांधकाम


- शब्दांकन -


सुरेश सवळे
केंद्रीय महासचिव
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ

blog-post-image

पत्रकार म्हणजे कोण ?


१) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते.
२) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते.
३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते.
४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते.
७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.
८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्य्कता असते.
९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.
१०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते.

वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. आम्ही हे नाही म्हणत सर्व चांगले आहेत, परंतु सर्व पत्रकार वाईट सुद्धा नाहीत. पत्रकार दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. ...





अशोक याऊल
केंद्रीय कोषाध्यक्ष
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ